मुंबई (प्रतिनिधी) : जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अधिवेशनात या प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. 

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, हा इतका गंभीर विषय आहे अध्यक्ष महोदय की, उद्या माझी बहीण, तुमची बहीण एवढं एक सेकंद नजरेत आणा. तुम्ही जर गृहमंत्री असता तर खून केला असता. अशा पद्धतीने तुमच्या, माझ्या आई बहिणीला नग्न करुन, कपडे काढून नाचायला लावलं जातंय आणि आम्ही नोंद घेवू म्हणतात. इथं मृत मनाचे आमदार आहेत? आमचं मन जिवंत आहे. उत्तरात सांगितलं पाहिजे की, एक तासात चौकशी करतो. काय कारवाई करणार आहे याचा अहवाल घेतो. पण म्हणतात नोंद घेतो. हे पाप फेडावं लागेल. आमच्या आई-बहिणीला नग्न केलं जातं या महाराष्ट्रात आणि आम्ही नोंद घेतो, अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर तोफ डागली.

दरम्यान, व्हिडिओसह इतर सर्व माहिती एकत्र केली जात आहे. जबाबही नोंदवले जात आहेत. याची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी याआधी बोलताना दिले होते.