गुवाहाटी (वृत्तसंस्था) : ‘ज्यांनी जीवन वेचले, ज्यांनी शिवसेनेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले त्यांची बदनामी केली जात आहे. बदनामी सहन करण्याची देखील एक मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडली तर आम्ही देखील बोलू. शिवाय सततच्या बदनामीमुळे आमचा देखील संयम सुटला तर खोके कुणाकडे गेले ते एक दिवस सांगितले जाईल. फ्रीजचा बॉक्स भरून कोणाकडे काय गेलं हे देखील सांगू, असा इशारा शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलाय. ते गुवाहाटी येथून बोलत होते. 

बुलढाणा येथील चिखली येथे उद्धव ठाकरे यांची आज सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी केलेल्या आमदार आणि खासदारांवर कडाडून टीका केली. त्यानंतर दीपक केसरकर यांनी प्रत्युुत्तर देत उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळे जास्त बोलत नाही. म्हणून त्यांनी काहीही बोलू नये. आमच्याकडे पण खूप गोष्टी आहेत. खोटं बोलण्याची मर्यादा ओलांडली तर आम्ही देखील तोंड उघडू; परंतु ठाकरे घराण्याविषयी आम्हाला आदर आहे. त्यांची बदनामी व्हावी अशी आमची इच्छा नाही; परंतु आमची अशीच बदनामी केली तर आम्ही देखील खोके कोठे गेले हे सांगू. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक का लढवली नाही? शेतकऱ्यांच्या हितासाठी उद्धव ठाकरे यांनी काय केले? ते त्यांनी सांगावे, असे आव्हान देखील केसरकर यांनी दिले.

“आम्ही २५ जण उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडून आपण आपल्या मूळ मित्र पक्षाकडे जावू, असं म्हणालो होतो; परंतु त्यावेळी त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलले; परंतु त्यांनी खोटे बोलण्याची मोहीम राबवली आहे. खोटे बोलण्यासाठी अनेक लोकांची नेमणूक केली. खोके-खोके म्हणून कोणाला हिणवता. एक दिवस या आमदारांचा संयम सुटेल आणि कायद्यामध्ये जसा माफीचा साक्षीदार हे कलम आहे. मग कळेल खोके कोणाकडे गेले ते. खोटे बोलण्याची देखील एक मर्यादा असते. त्यांनी ती मर्यादा ओलांडू नये अन्यथा आम्ही देखील तोंड उघडू, असा इशारा दीपक केसरकर यांनी दिला आहे.