मुंबई (प्रतिनिधी) : ‘धमकीची भाषा वापरणे हे शिवसेनेलाच जमते. जर हिंमत असेल तर माझ्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये जा, ही माझी वॉर्निंग आहे, अशा शब्दांत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक व्यवहाराबद्दल उत्तर द्यावे, असंही सोमय्या म्हणाले.

आज (शुक्रवार) पुन्हा एकदा सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल केला. सोमय्या यांनी सांगितले की, ‘या सरकारच्या वर्षपूर्तीआधी आणखी तीन घोटाळे बाहेर काढणार आहे. याचा तपास लोकायुक्तांनी करावा असे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत. यावर संजय राऊत आणि शिवसेना नेते का बोलत नाहीत. धमकीची भाषा संजय राऊतांची आहे. आम्ही त्या भाषेत बोलणार नाही. राऊतांमध्ये हिंमत असेल तर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करावी, आता ही माझी वॉर्निंग आहे. हिंमत असेल तर त्यांनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावी.

तीस सातबाऱ्यांवर अन्वय नाईक परिवार आणि रश्मी ठाकरे यांचे एकत्रित नाव आहे. मूळ मुद्दे भरकवटण्याचा प्रयत्न केले जात आहे. नाईक, वायकर आणि ठाकरे परिवारात काय आर्थिक लागेबांधे आहेत ? मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आर्थिक व्यवहाराची उत्तरं द्यावीत, असंही त्यांनी म्हटले आहे.