सातारा (प्रतिनिधी) : हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन,  असे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. एकमेकांचं झाकायचं आणि सोयीप्रमाणे काढायचं,  असे म्हणत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

जसं आपण पेरतो, तसं उगवतो. आमच्या मागे ईडी नाही. ज्यांनी वाईट केलं आहे त्यांच्याच मागे का लागले आहेत. त्यांना ईडीच्या कारवाईमागे भाजपचे षडयंत्र असल्याच्या आरोपाविषयी विचारले असता ते म्हणाले की,  कोणीही असू दे मी सर्वांची यादी देतो. एकमेकांचं झाकायचं आणि सोयीप्रमाणे एकमेकांचं काढतात. बास झालं आता राजकारण, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

राज्यातील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांविरोधात ईडीने  कारवाईचा धडाका लावला आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा  वापर करून भाजपकडून राज्यातील ठाकरे सरकार अस्थिर  करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार केली जात  आहे. आता यावर खा. उदयनराजे यांनी भाष्य करून अप्रत्यक्ष भाजपवर निशाणा साधला आहे.