मुंबई (प्रतिनिधी) : देशात आधीपासून तयार झालेल्या  आघाड्या आणखी मजबूत व्हायला पाहिजेत, असे आमचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही आम्ही सरकार चालवत आहोत. काँग्रेसला दूर ठेवून कोणती आघाडी होत असेल, तर हे योग्य नाही,  अशी प्रतिक्रिया देत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी युपीएबाबत केलेले विधान खोडून काढले आहे.  

काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी मोदी-शहा यांच्या भाजपला तोंड देऊ शकत नाही,  असे काँग्रेसचे म्हणणे आहे. यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ममता बॅनर्जीं  यांनी मुंबई  दौऱ्यात कुठे आहे युपीए ? असे वक्तव्य  करून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचे अस्तित्व पूर्णपणे नाकारले आहे.

यावर राऊत यांनी म्हटले आहे की, ममता बॅनर्जी या देशातील मोठ्या नेत्या आहेत.  पश्चिम बंगालमध्ये त्यांनी ज्याप्रकारे संघर्ष करुन विजय मिळवला, तो प्रेरणादायी आहे. तसेच महाराष्ट्रात निवडणुकांनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तीन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार बनवले. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या राजकारणाने देशाला एक दिशा दिली आहे. युपीए कुठे आहे हा ममतांचा प्रश्न योग्य आहे. उद्धव ठाकरेंनीही वारंवार हाच प्रश्न विचारला आहे. जर युपीए नाही. तर एनडीएसुद्धा कुठे आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. पण २०२४साठी वेगळी आघाडी उभी राहत असेल, त्याचा काय फायदा होईल, याचा विचार करायला हवा.