सरकार पडल्यास भाजपबरोबर जाणार नाही : शरद पवार

0
127

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील सरकार पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. ‘आम्ही विरोधी बाकावर बसू. पण भाजपबरोबर जाणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडीवर भाष्य करताना शरद पवार हे नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या घटनाक्रमावर योग्य तो तोडगा काढतील असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. ‘एकनाथ शिंदेंची बंडखोरी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर योग्य तो तोडगा काढतील. माझा शिंदेच नव्हे तर कुणाशीही संवाद झाला नाही. शिंदेंनी ठाकरेंपुढे भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवल्याची मला कल्पना नाही. किंवा त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचेही मला ठावूक नाही; पण उद्धव यावर योग्य तो तोडगा काढतील व सरकार त्यांच्या नेतृत्वात यापुढेही सक्षमपणे चालेल असा मला ठाम विश्वास आहे’, असे पवार यांनी स्पष्ट केले.

‘महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी भाजपने आमदार फोडण्याचा प्रयत्न केला होता; पण तो फोल ठरला. त्यानंतर सलग अडीच वर्षे सरकार सुरुळीत चालत आहे. त्यामुळे भाजपकडून सरकार पाडण्याचे असे प्रयत्न होत आहेत,’ असे पवार म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आपण नाराज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे व अमित शहांच्या प्रस्तावित भेटीविषयीही पवारांनी बोलण्यास नकार दिला. ‘कुणी कुणाची भेट घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझी कुणाशीही चर्चा झाली नाही. माझी मुख्यमंत्र्यांशीही याविषयी चर्चा झाली नाही. मी लवकरच मुंबईला जाईल. त्यानंतर पुढील पाऊले उचलली जातील,’ असे ते म्हणाले.

सत्ताधारी महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले. ‘विधान परिषदेच्या निवडणुकीत थोडीफार क्रॉस व्होटिंग झाली. क्रॉस व्होटिंगनंतरही सरकार चालते हा माझा ५० वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे कालच्या निकालानंतर आमच्यात कोणतीही नाराजी नाही. थोडेफार इकतेतिकडे होते. पण, त्याचा सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. आघाडीत मतभेद नाहीत,’ असे पवार म्हणाले.

‘आम्ही विरोधी बाकावर बसू. पण भाजपबरोबर जाणार नाही. पत्रकारांच्या या प्रश्नावर पवार काहीक्षण हसल्याचेही दिसले. त्यामुळे त्यांच्या या हास्याचा नेमका काय अर्थ निघतो,’ हे येणारा काळच ठरवेल, असे पवार म्हणाले.