सातारा (प्रतिनिधी) : राज्यात १९ फेब्रुवारीरोजी साजरी करण्यात येणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही नियमावली घालून दिली आहे. परंतु यावर शिवभक्तांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर विरोधी पक्ष भाजपने टीका केली आहे. तर यावर भाजप खासदार उदयनराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (रविवार) येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.     

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीला पोवाडे,  बाईक रॅली, मिरवणूका यावर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत, यावर उदयनराजे म्हणाले की,  छत्रपती शिवाजी महाराज ही राज्याची नाही तर देशाची अस्मिता आहे, त्यामुळे शिवजयंती साजरी झालीच पाहिजे. पण शिवजयंती साजरी करताना कोरोनाची काळजी घेणे आवश्यक आहे. ही प्रशासनासोबत आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.  शिवजयंती साजरी झालीच पाहिजे, परंतु लोकांची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आज असते, तर त्यांनीही लोकांच्या काळजी घेण्यालाच प्राधान्य दिले असते. त्यांनीही सर्वांना जपण्याची काळजी घेतली असती.  त्यामुळे येत्या १९ फेब्रुवारीस साध्या पणाने जयंती साजरी करण्यासाठी शिवजयंती मंडळांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य शासनाने काही निर्बंध देखील घातले आहेत. यामुळे राज्यात शिवप्रेमींमधून संताप होण्याचे काही कारण नाही, असे ते म्हणाले.