मुंबई (प्रतिनिधी) : कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या कामाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आता विरोधक आणि ठाकरे सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. हा वाद मिटण्याची चिन्हे दिसत नसल्याने आता महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी मोठी भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्याशी बोलून काहीतरी मार्ग काढण्याचा ते प्रयत्न काढणार असल्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

कांजूरमार्ग येथील कारशेडचा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार प्रयत्न करणार असल्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. शरद पवार कांजूरमार्ग कारशेड प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गरज पडली तर ते एक किंवा दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील भेटतील. या मुद्द्यावर पवार मोदींशी चर्चा करतील, अशी माहिती मलिक यांनी दिली. तसेच, मुंबईच्या विकासात अडथळा नको यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही प्रयत्न करत आहेत. या सर्वांत शरद पवार मद्यस्थी करत असल्याचे त्यांनी सांगितले.