इंदौर (वृत्तसंस्था) : लग्नाच्या आमिषाने शारीरिक संबंध ठेवले जातात. त्यानंतर फसवूणक झाल्यास संबंधित पीडितेकडून बलात्काराचा आरोप केला जातो. असे प्रकार सर्रास होऊ लागले आहेत. यावर मध्य प्रदेशातील इंदौर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. लग्नाची खात्री नसेल, तर मुलींनी शारीरिक संबंध ठेवू नयेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. एका बलात्कार प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की, भारत रूढी आणि परंपरा जपणारा देश आहे. देशाच्या सभ्येतच्या मर्यादा असल्याने लग्नाअगोदर मुलगा आणि मुलींमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित होण्यास मान्यता दिली जात नाही. त्यामुळेच येथे सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या जात नाहीत. जेथे लग्नाअगोदर केवळ वचन आणि आश्वासनांवर मुलगा व मुलींमध्ये संबंध ठेवले जातील. जर एखाद्या मुलाने एखाद्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. तर पुढील जबाबदाऱ्यांचा सामना करण्याची तयारी त्याने ठेवायला हवी.

लग्नाचे आमिष दाखवून एका तरूणाने पीडित मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. तसेच मुलगा मुस्लीम असल्याने मुलीच्या आई-वडिलांनी या लग्नाला विरोध केला होता. आरोपीने २०१८ पासून लग्नाचे आमिष दाखवून पीडितावर सातत्याने बलात्कार केला. त्यानंतर लग्नास नकार दिला. तसेच दुसऱ्या मुलीसोबत लग्न होत असल्याचे समजताच पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकरणावर न्यायालयाने निकाल दिला आहे.