मुंबई (प्रतिनिधी) : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्यात विरोधी पक्ष भाजपला यश आल्याचे दिसत आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करून अटक करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या प्रकरणात आता मनसेने उडी घेतली आहे. लोकहिताच्या प्रश्नांवर विधानसभेत कोणतीही चर्चा होत नाही, अशी टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

सरकारच्या चुका लक्षात आणून देणे हे विरोधकांचे कामच आहे. दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील पदावर असताना आमचं म्हणणं योग्य असेल, तर संबंधितांवर त्वरित कारवाई करायचे, असे म्हणत नांदगावकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.

सचिन वाझे यांनी सत्याचा स्वीकार करून आपला राजीनामा द्यावा. सभागृहाचे कामकाज अशा प्रकरणावरून बंद पाडणे योग्य नाही. विधानसभेत केवळ अंबानी आणि सचिन वाझे प्रकरणावरच चर्चा होते. लोकहिताच्या प्रश्नांवर कोणतेही काम होत नाही, अशी टीकाही नांदगावकर यांनी यावेळी केली आहे.