अमरावती (वृत्तसंस्था) : ‘ही पहिली वेळ आहे. त्यामुळे आम्ही माफ करतो; पण आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही’, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी आ. रवी राणा यांना दिला. तसेच राणा यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा विषय माझ्यासाठीही संपला असल्याचे ते म्हणाले. रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादानंतर बच्चू कडू यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर मेळाव्याला कडू यांनी मार्गदर्शन केले.

सत्ता गेली चुलीत, त्याची आम्हाला काही पर्वा नाही, आम्ही एवढे ताकदवान आहे की, २० वर्षे साडेतीनशे गुन्हे घेऊन फिरतो असा शब्दात अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांनी आपला आक्रमकपणा दाखवला आहे. बच्चू कडू यांनी रवी राणा वादावर उत्तर देण्यासाठी आज अमरावतीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते.

अमरावतीचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यातील वादानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही बाजूंनी आरोपांच्या फैरी थांबल्या. मुंबईत झालेल्या बैठकीनंतर आमदार रवी राणा यांनी दिलगीरी व्यक्त केली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी सोमवारी रात्री कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतल्या आणि आपली भूमिका जाहीर करण्यासाठी आज अमरावती येथे मेळाव्याचे आयोजन केले होते.

बच्चू कडू म्हणाले, जली तो आग कहते है बुझी को राख कहते, जिस राख से बारुद निकलती हो उसे प्रहार कहते है… प्रहार काही आंडूपांडूचा पक्ष नाही, एक वार प्रहार दहा तुकडे करण्याची ताकद आमच्यात आहे. जिथे असून तिथून वार करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. मैदानात आले तर मैदानात, सेवेमध्ये आले तर सेवेमध्ये, रक्तदानात आले तर रक्तदानात, तलवारीत आले तर तलवारीमध्ये सुद्धा आम्ही कमी पडत नाही.

आम्ही कोणाच्या वाट्याला जात नाही, गेलो तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. विनाकारण तोंड माराल तर तोंड रंगवल्याशिवाय राहणार नाही. अशा शब्दात बच्चू कडूंनी थेट आव्हान दिले आहे. बाकीचे नेते लढ म्हणतात आणि बच्चू कडू स्वत: लढतात. हा फरक आहे दोघांमध्ये… मी असे लढ म्हणाऱ्यांपैकी नाही. हम तो खुद आ जाते है मैदान मै…. आम्ही सैनिकासारखे जगतो, फेरविचार करत नाही, असे ते म्हणाले.