भारताने तिसरी कसोटी जिंकल्यास ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी होणार

0
10

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आजपासून लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर रंगत आहे. भारताने १-० ने आघाडी घेतल्याने इंग्लंडवर दडपण आहे. हा सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधण्याची इंग्लंडची धडपड असेल.

भारताने हा सामना जिंकल्यास ३५ वर्षापूर्वीच्या विक्रमाची बरोबरी होणार आहे. यापूर्वी १९८६ मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडला २-० ने पराभूत केले होते. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विराटने मागील सामन्यातील संघ या कसोटीतही कायम राखला आहे.

हेडिंग्ले हे नेहमीच क्रिकेटपटूंसाठी एक वास्तविक कसोटी घेणारे मैदान राहिले आहे. येथे बचावात्मक खेळाला फारसा वाव नाही. गेल्या २० वर्षांची आकडेवारी या वस्तुस्थितीची साक्ष आहे. या दरम्यान, हेडिंग्ले येथे झालेल्या १८ पैकी १७ कसोटी सामन्यांचा निकाल लागला आहे. २०२१मध्ये फक्त एक कसोटी अनिर्णित राहिली.