कर्नाटक (वृत्तसंस्था) : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जनता दल सेक्युलरचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘भारतीय जनता पार्टीसोबत असतो, तर आतापर्यंत आपण पुन्हा मुख्यमंत्री म्हणून राहिलो असतो. पण काँग्रेससोबत आघाडी करून जे काही कमावलं होतं, ते सगळं संपलं,’ असे म्हणत कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर संताप व्यक्त केला आहे.

मैसूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ‘मी आता सुद्धा मुख्यमंत्री असतो, जर भाजपासोबतचे संबंध चांगले ठेवले असते तर. मी २००६-२००७ मध्ये आणि १२ वर्षांच्या काळात जे काही मिळवलं होतं. मी ते सगळं काँग्रेससोबत आघाडी करून संपवून टाकलं,’ असे कुमारस्वामी म्हणाले.

‘मी २००६-०७मध्ये मुख्यमंत्री म्हणून मी राज्यातील जनतेचा विश्वास संपादित केला होता. तो विश्वास पुढचे १२ वर्षे टिकवून ठेवला. पण, काँग्रेसची साथ पकडल्यानंतर सगळं काही गमावून टाकलं. २०१८मध्ये काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतर सिद्धारामैय्या आणि त्यांच्या समर्थक गटाने माझी प्रतिष्ठा संपवून टाकली. मी फक्त त्यांच्या जाळ्यात फसत गेलो, कारण देवेगौडा यांच्यामुळे आघाडीसाठी सहमत होते,’ असं कुमारस्वामी म्हणाले.