वाहनांवरील हल्ले थांबले नाही तर वेगळी भूमिका घेऊ : शरद पवार

0
24

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर आता राज्य सरकारने भूमिका घेणे गरजेचे होते; मात्र आता वेगळी भूमिका घेतली जात नाही. आज झालेल्या हल्ल्यानंतर झाले सीमाभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या २४ तासात वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत, तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर जे होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जतमधील गावांवर हक्क सांगितल्यापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड संघटनांकडून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. विविध संघटना ट्रकवरील हल्ल्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आता वेगळी भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचा इशारा दिला आहे.