गडहिंग्लज  (प्रतिनिधी) : गडहिंग्लज  शहरात प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर थांबविण्यासाठी उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी नामी शक्कल लढवली आहे. यापुढे कोणत्याही दुकानात जर प्लॅस्टिक कॅरीबॅग सापडली, तर त्या दुकानदाराचा हार घालून जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तरी प्लॅस्टिक कॅरीबॅग वापरू नये, असे आवाहन कोरी यांनी व्हॉट्सअपवरून  केले आहे.

प्लॅस्टिक कॅरीबॅगवर बंदी घालून एक वर्ष उलटले, तरी अनेक ठिकाणी कॅरीबॅगचा वापर सर्रास सुरूच  आहे. प्रशासनाच्या कारवाईनंतर वापर  तेवढ्या पुरता थांबतो.  आणि काही दिवसानंतर तो पुन्हा सुरू होतो.  यावर जालीम उपाय महेश कोरी यांनी शोधून काढला आहे. प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर करून नागरिकांनी स्वतःचा अपमान करून घेऊ नये.  तसेच दुकानदारांनीही कॅरीबॅग दुकानात ठेवू नये,  असे आवाहन त्यांनी व्हॉट्सअप वरून केले आहे. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या मेसेजची सोशल मीडियावर  जोरदार चर्चा होत असून उपनगराध्यक्षांच्या अनोख्या गांधीगिरी पद्धतीच्या आवाहनाला जनता कितपत प्रतिसाद देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.