कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीचे मतदान उद्या (मंगळवारी) १ डिसेंबरला सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत होणार आहे. मतमोजणी गुरूवारी ३ डिसेंबरला होईल. दरम्यान, मतदानासाठी मतदारांना ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे.

मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, अशा मतदार त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त इतर ओळखपत्र दाखवू शकतात. यामध्ये आधार कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायविंग लायसन्स), पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट, राज्य, केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा अन्य खाजगी उद्योग समूहांनी कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, लोकसभा व राज्यसभा सदस्य,विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य यांना निर्गमित केलेली अधिकृत ओळखपत्र, पदवीधर, शिक्षक मतदार संघामधील शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना संबंधित संस्थांनी निर्गमित केलेले ओळखपत्र, विद्यापीठाने निर्गमित केलेले पदवी, पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाने दिव्यांग व्यक्तींना दिलेले ओळखपत्र दाखवण्याची मुभा देण्यात आली आहे.