कोल्हापूर (प्रतिनिधी) : समाजाच्या सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर असून आदर्श कुटुंब आणि आदर्श समाज घडविण्यात महिलांचे फार मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज (मंगळवार) येथे केले. महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने कौमी एकता सप्ताहनिमित्त स्थायी समिती सभागृहात आयोजित केलेल्या महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या की, अनेक क्षेत्रात काम करताना आदर्श कुटुंब बनविण्यात महिला मागे नाहीत. मुलांना घडविण्याचे काम महिलाच करत असून नवी पिढी शिक्षित, संस्कारक्षम आणि आदर्शवत बनविण्यात महिलांचे योगदान सर्वार्थाने महत्वाचे आहे. महापालिकेतही महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नेटकं काम करुन आपल्या महापालिकेची गौरवशाली परंपरा अधिक वृध्दींगत करावी.

या प्रसंगी उप-आयुक्त निखिल मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास  महापालिकेतील महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या. महिला व बालकल्याण विभागाच्या अधिक्षिका प्रिती घाटोळे यांनी स्वागत केले.