इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीतील  वॉर्ड क्र. १६ आयजीएम परिसर, गोंधळी गल्लीम़धील महिलांनी भागातील समस्या आणि धोकादायक आरोग्यजन्य परिस्थितीबाबत आज (शुक्रवार) नगरपालिका दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी ड्रेनज पाईपलाईन, नवीन गटार बांधकाम आणि अन्य नागरी सुविधांसाठी  महिलांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांना भागातील समस्या सांगितल्या. तसेच संबंधित वाँडचे नगरसेवक प्रकाश मोरबोळे यांनाही महिलांनी जाब विचारला.

यावेळी जुन्या गटारी नादुरुस्त, भागात घुशीचे प्रमाण वाढल्यामुळे सिंमेट काँक्रीटचे रस्ते खचले आहेत. परिणामी गटारीतील सांड पाण्याचा योग्य  निचारा होत नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढून नागरिकांना डेंग्यू, मलेरिया सारख्या साथीच्या आजाराला बळी पडण्याचा धोका वाढला आहे. नुकताच डेंग्यूच्या आजाराने एका नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच आता ड्रेनेज पाईप लाईन  सुस्थितीत नसल्याने मैलायुक्त सांडपाणी गटारीत मिसळून भागात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी या प्रश्नांबाबत तातडीने कार्यवाही करू, असे आश्वासन आंदोलनकर्त्या महिलांना दिले.

यावेळी पूनम मिरगे, संगीता सावईराम, कविता चंदूरे, शोभा हरणे, बेबीताई चंदूरे, साईराज जुव्वे, रेशमा शेख, संगीता शिंदे, बेबी सतूके, रवि हारगे, प्रशांत वासुदेव, संतोष कांदेकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या.