इचलकरंजी (प्रतिनिधी) :  इचलकरंजीतील पंचगंगा नदीपात्रला दोन्ही बाजूंनी जलपर्णीने विळखा घातला आहे. पैलवान अमृत भोसले यांनी ही नदी जलपर्णीमुक्त करण्यासाठी मोहीम राबविण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांनी व्यंकोबा मैदानातील सर्व छोट्या-मोठ्या पैलवानांना सोबत घेऊन आज (बुधवार) या मोहिमेला प्रारंभ केला.

पैलवान अमृत भोसले यांनी यापूर्वीही त्यांच्या पैलवानांसह जलपर्णी काढण्यासाठी अनेकदा मोहीम हाती घेतली होती. तसेच पंचगंगा नदी परिसर सफाई अभियानही राबविले आहे. यावर्षीही त्यांनी इतरांच्या मदतीने ही मोहीम सुरू केल्यामुळे पंचगंगा नदी लवकरच जलपर्णीमुक्त होण्यास मदत होणार आहे. तसेच पंचगंगा नदी जलपर्णीमुक्त होईपर्यंत ही मोहीम सुरूच राहणार आहे. शहरातील विविध संस्था, तरुण मंडळांनीही या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही भोसले यांनी केले आहे.

या मोहिमेत डॉ. विजय माळी, शुभम कोरे, शुभम धुमाळ, संदेश आजगेकर, यश बागडी, पालिका कर्मचारी, पंचगंगा वरद विनायक बोट क्लब यांनी सहभाग घेतला.