इचलकरंजीत दिव्यांगांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा…

0
108

इचलकरंजी (प्रतिनिधी) : दिव्यांगांना पेट्रोल दरात ५० टक्के सवलत मिळावी, त्यांना जागेसह घरकुल बांधून द्यावे, मासिक १५ हजारांचे अनुदान मिळावे. यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी आज (सोमवार) दिव्यांग कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने इचलकरंजीत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमच्या मागण्या मान्य करा, आम्हाला न्याय द्या अशा जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी विकास खरात यांना देण्यात आले.

दिव्यांगांना वाहन घेण्यासाठी ४० टक्के सवलत मिळावी, त्यांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावे, विना अट विना जामीन कर्ज मिळावे ,दिव्यांगांच्या मुलांना सरकारी नोकरीत भरती करुन घ्यावे ,मासिक १५ हजार रुपये पेन्शन मिळावी, कुटूंबाच्या पालन पोषणासाठी मासिक ७ हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, सरकारी नोकरीत आरक्षण द्यावे, मोफत रेल्वे प्रवासासाठी स्मार्ट कार्ड मिळावे, पालिकेकडून पाच टक्के अनुदानाची रक्कम मिळावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच प्रलंबित मागण्यांबाबत तत्काळ कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी दिव्यांग कल्याण सेवाभावी संस्थेचे अनिल पाटील, प्रकाश शानवाडे, प्रदीप देवधर, सुधीर लोले, संभाजी सुर्यवंशी, अशोक कुंभार, दिनेश ठाणेकर, इसामद्दीन इनामदार, भारत निंबाळकर ,सुनील साळुंखे यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते.