इचलकरंजीत तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

0
945

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरातील शांतीनगर परिसरात असणाऱ्या कत्तलखान्याच्या पाठीमागे एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याचा प्रकार आज (बुधवार) सकाळी उघडकीस आला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला. परंतु मृत तरुणाची ओळख पटलेले नाही. या हत्येमुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इचलकरंजी येथील शांतीनगर परिसरात असणाऱ्या कत्तलखान्याजवळील मोकळ्या जागेत एका युवकाच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झालेल्या अवस्थेतील मृतदेह आज (बुधवारी) सकाळी आढळला. या युवकाचा चेहरा अक्षरशः चेंदामेंदा केल्याने त्याची ओळख पटलेली नाही. मयत युवकाचा मृतदेह घटनास्थळापासून काही अंतरावर फरपटत नेल्याचे पोलिसांना पंचनामा करताना आढळले. तसेच घटनास्थळी मृतदेहाजवळ मोटारसायकलची चावी व अन्य काही वस्तू आढळून आल्या आहेत.

हा खून नेमका कधी ? आणि कोणत्या कारणातून झाला असावा ?, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपाधीक्षक बी.बी.महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच इचलकरंजी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन आरोपींचा तत्काळ शोध घेण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.