इचलकरंजी वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनधारकांकडून केला कोट्यवधींंचा दंड वसूल

0
69

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून वर्षभरात सुमारे १ कोटी १० हजार ७०० रुपये इतकी दंडात्मक वसुली केली असल्याची माहिती इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण कक्षाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली.

मोरे यांनी सांगितले की, सायलेन्सरमध्ये बदल करुन बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करताना त्यांच्याकडून वर्षभराच्या कालावधीत सुमारे ९५ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे. तर ३१ डिसेंबर रोजी दारु पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी २४ वाहने ताब्यात घेतली होती. यातील तिघा वाहनधारकांना न्यायालयाने ५ दिवस कारावासाची शिक्षा व अन्य वाहनधारकांना दंडाची कारवाई केली आहे. याशिवाय सायलेन्सरमध्ये बदल करणे, कर्कश हॉर्न, प्रखर दिवे, विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट, साईड आरसे न लावणे अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वर्षभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन वाहन चालवणाऱ्यांकडून सुमारे १ कोटी १० हजार ७०० रुपये इतक्या रकमेची दंडात्मक वसुली केली आहे.