इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील पुरवठा कार्यालयाला शहीद दिनाचा विसर पडल्याचे आज दिसून आले. त्यामुळे याची माहिती मिळताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुरवठा कार्यालय आवाराची स्वच्छता करुन शहीद स्तंभाचे पूजन करून अभिवादन केले. दरम्यान, शहीद दिन साजरा न केल्याबद्दलचा जाब भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुरवठा निरीक्षक अधिकारी अमित डोंगरे यांना विचारून धारेवर धरले. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागितली.  

शासनाच्या वतीने देशभरात दरवर्षी २३ मार्च हा क्रांतीवीर भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या बलिदानाची आठवण करुन देणारा शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु पुरवठा कार्यालय आवारात असलेल्या शहीद स्तंभाची स्वच्छता किंवा पूजन असे कोणतेच सोपस्कार संबंधित कार्यालयाकडून पार पाडले नसल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी तत्काळ पुरवठा कार्यालय आवारात धाव घेतली. तसेच परिसराची स्वच्छता करून शहीद स्तंभास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी भाजपचे अमृत भोसले, प्रदीप माळगे, उत्तम कुंभार, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण पाटील, प्रमोद बचाटे, अरविंद चौगुले, प्रवीण बनसोडे, नामदेव सातपुते, मनोज तराळ, श्रेयांशी जोके, वैभव कांबळे, समीर आरकाटे आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.