इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत चाललेला आहे. तो रोखावयाचा असेल तर सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करण्यासह प्रशासनाला सहकार्य करावे. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष सौ. अलका स्वामी यांनी केले आहे. सौ. स्वामी आणि राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी चांदणी चौक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लस घेतली. यानंतर त्यांनी नागरिकांना आवाहन केले.

सौ. स्वामी यांनी सांगितले की, शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासह नगरपरिषदेच्या जवाहरनगर, लालनगर, चांदणी चौक (गावभाग), कलावंत गल्ली, तांबेमाळ व शहापूर या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु आहे. ही लस अत्यंत सुरक्षित असून त्याचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही. ज्येष्ठ नागरिकांनी प्रथमत: लस घ्यावी. आता शासनाने ४५ वर्षांवरील सर्वांना लस घेण्यास मंजुरी दिली असल्याने न घाबरता सर्वांनी नजीकच्या केंद्रात जाऊन लस घ्यावी.

या वेळी आरोग्य सभापती संजय कैगार, मा. नगरसेवक दिलीप मुथा, संग्राम स्वामी, राहुल जानवेकर, आरोग्य निरीक्षक विजय पाटील, आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.