इचलकरंजीवासियांचा लॉकडाऊनच्या काळातील घरफाळा, पाणीपट्टी माफ करावी : मनसेची मागणी

0
24

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरातील मालमत्ताधारकांचा लॉकडाऊनच्या काळातील घरफाळा, पाणीपट्टी माफ करावी. त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेच्यावतीने आज (बुधवार) इचलकरंजी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी केतन गुजर यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात लॉकडाऊन जाहीर झाल्याने उद्योग, व्यवसाय बंद पडून सर्वसामान्य जनतेचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत इचलकरंजी नगरपालिकेने घरफाळा आणि पाणीपट्टीची वसुलीसाठी जोरदार मोहिम सुरुवात केली आहे. त्यामुळे नगरपालिकेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून लॉकडाऊन काळातील  घरफाळा, पाणीपट्टी माफ करावी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा. याची कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

यावेळी मनसेचे शहरप्रमुख प्रताप पाटील, रवी गोंदकर, मोहन मालवणकर, मनोहर जोशी, नितीन कटके, संदीप पोवार, उत्तम पाटील, सौरभ संकपाळ, विकास जगताप आदी उपस्थित होते.