इचलकरंजीमध्ये वृद्धेसह तरुणावर तलवारीने वार : तिघांवर गुन्हा

0
74

इचलकरंजी (प्रतिनिधी) : किरकोळ कारणावरून वृद्धेसह तरुणावर तलवार आणि कुऱ्हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी करणाऱ्या तिघांवर इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अजय देसाई, पंकज देसाई व भैय्या देसाई अशी आरोपींची नावे आहेत. हा प्रकार आज (सोमवार) इचलकरंजीतील लालनगर येथील शाळा क्र. १२ नजीक घडला. श्रीमती नंदा वाजत्री व शुभम उर्फ ऋषी तारळेकर अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हे वाजत्री यांच्या घरासमोर येऊन जोरजोराने ओरडून शिवीगाळ करत होते. श्रीमती नंदा यांनी शिवीगाळ का करत आहे असे विचारत असताना रागाच्या भरात अजय देसाई यांनी श्रीमती नंदा यांच्या डाव्या मांडीवर वार केला. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या शुभमला अजय व पंकज यांनी तलवारीने डाव्या हाताच्या कोपऱ्यावर व बोटावर वार करून जखमी केले. या घटनेचा अधिक तपास हे. कॉ. आर.पी.पाटील हे करत आहेत. गावभाग पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या लालनगरमध्ये हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.