इचलकरंजी महावितरण कंपनीकडे कोट्यावधींची थकबाकी : सोमाण्णा कोळी

0
100

इचलकरंजी (प्रतिनिधी) : वस्त्रोद्योग, घरगुती, शेती आणि अन्य व्यवसायाची इचलकरंजी महावितरण कंपनीकडे जानेवारी २०२१ अखेर तब्बल ९५ कोटी इतकी थकबाकी आहे. अशी माहिती कार्यकारी अभियंता सोमाण्णा कोळी यांनी दिली. आधीच संकटातच्या गर्तेत सापडलेला वस्त्रोद्योग मागील वर्षी कोरोनामुळे आणखीनच खालवला गेला. संपूर्ण उद्योग, व्यवसाय, कंपन्या बंद ठेवाव्या लागल्याने जागतिक मंदी निर्माण झाली आहे.

आता हा व्यवसाय पूर्वपदावर येत असला तरी बँकांचे हप्ते, वीज बिले आणि अन्य देणी भागवेपर्यंत व्यवसायाची घडी बसण्यास वेळ लागणार आहे. इचलकरंजी शहरात वस्त्रोद्योग व्यवसायाशी निगडीत १६ हजार ७०० ग्राहक असून त्यापैकी ६ हजार १२५ ग्राहकांची थकबाकी ३५ कोटी इतकी आहे. घरगुती ग्राहक कनेक्शनची संख्या ४८ हजार ३२४ इतकी असून त्यांची थकबाकी २४.२५ कोटी इतकी आहे. तर इतर व्यवसाय क्षेत्रातील ५ हजार ९५२ कनेक्शन असून त्यांची ५.८६ कोटी इतकी थकबाकी आहे.

त्याचबरोबर शेतीपंपासाठी ६ हजार कनेक्शन असून त्यांची १५ कोटी इतकी थकबाकी आहे. परंतु शेती पंपासाठी २०२०-२१ ची थकबाकी भरणार्‍या ग्राहकाला शासनाने ५० टक्के सवलत दिली असल्यामुळे सध्या असणारी १५ कोटीची थकबाकी शंभर टक्के वसुली अंती ७.५ कोटी इतकी होणार आहे.