इचलकरंजी (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील १०५ दिवसांपासून इचलकरंजी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद होती. यामुळे शहरामध्ये काहीसा शुकशुकाट पहायला मिळत होता. काही हौशी नागरिक विनाकारण फिरत होते पण त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात होता. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी आल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व दुकाने विहित वेळेत सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय जाहीर केला.

कालपासून इचालकरंजी शहरातील सर्व दुकाने सुरू झाली आहेत. ओस पडलेले रस्ते आता पुन्हा गजबजु लागल्या आहेत व बाजारपेठा बहरू लागल्या आहेत. आगामी गणेशोत्सवासह विविध सण काही दिवसांवर आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दुकाने सुरू झाल्याने ग्राहकांमधूनही या निर्णयाचे कौतुक होत आहे. व्यापाऱ्यांसह नागरिकांनीही योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे, जेणेकरून पुन्हा पॉझिटिव्हीटी रेट वाढू नये. अन्यथा, पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जाऊ लागू शकते.