इचलकरंजी (प्रतिनिधी) : महापूरामुळे नुकसान झालेल्या शहर आणि परिसरातील पूरग्रस्तांना येत्या दोन दिवसात शासनाकडून जाहीर केलेली मदत मिळणार आहे. तर व्यवसाय, दुकाने, घरांची पडझड आणि शेतीचे पंचनामेही लवकरच पूर्ण करुन त्यांनाही आवश्यक ती मदत दिली जाणार आहे. इंदिरा गांधी रुग्णालय इमारतीच्या दुरुस्तीसाठी ११ कोटींच्या कामाला लवकरच सुरुवात होत असल्याची माहिती आ. प्रकाश आवाडे यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.

आ. आवाडे म्हणाले की, महापूरामुळे गावभागातील पूरक्षेत्रातील नागरिकांसह दुकाने, व्यवसाय, औद्योगिक क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तातडीने शासनाकडून मदत मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील होतो. त्याला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळून नुकसानग्रस्त घरांच्या पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठीची नुकसानीची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाली असून येत्या दोन दिवसात ही रक्कम त्या त्या नुकसानग्रस्त कुटुंबांना मिळणार आहे.

तर दुकाने, यंत्रमाग कारखाने, औद्योगिक व्यवसायांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार असून लवकरच प्रत्यक्ष पंचनामे होऊन त्यांनाही मदत दिली जाणार आहे. पूरामुळे पडझड झालेल्या घरांचे पंचनामे पथकाद्वारे केले जाणार असल्याचे सांगितले. पूर्ण पडझड झालेल्यांसाठी दीड लाख, ५० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त पडझड झालेल्यांसाठी ५०  हजार तर ५० टक्क्यापेक्षा कमी पडझड झालेल्यांना २५ हजार रुपये दिले जाणार आहेत.

शहरातील इंदिरा गांधी सामान्य इमारत दुरुस्तीसाठी मंजूर ११ कोटी रुपये खर्चाच्या कामाची सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होत आहे. शेळके मळा परिसरातील सबस्टेशनची जवळपास पहिल्या मजल्यापर्यंत उंची वाढवून त्यावर ट्रान्सफर बसविण्याचा निर्णय झाला आहे. वस्त्रोद्योगाला उभारी मिळावी यासाठी तत्कालीन राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयाची आताच्या सरकारने अंमलबजावणी करावी यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. लवकरच प्रलंबित प्रश्‍नांची सोडवणूक होऊन आवश्यक अनुदान व निधी लवकरच मिळेल असे आ. आवाडे म्हणाले.

या पत्रकार परिषदेत प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, प्रकाशराव सातपुते, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, सुनिल पाटील, दीपक सुर्वे, संजय केंगार, राजू बोंद्रे, सागर कम्मे, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते.