इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती बसस्थानक’ असे नामकरण करावे अशी मराठा महासंघाची सातत्याने मागणी आहे. शिवजयंती दिनी या बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात लावण्यात आलेला फलक उतरविण्यात आल्याने आ. आवाडे यांनी आंदोलन केले होते. यासाठी मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आ. प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली.

मंत्री परब यांच्या मुंबई येथील शिवालय मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार आवाडे यांनी वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती देत बसस्थानकाचे नामकरण करण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी मंत्री परब यांनी याप्रश्‍नी लवकरच राज्यमंत्री पाटील हे आल्यानंतर एक व्यापक बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली.

या बैठकीत मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत, कार्याध्यक्ष अरुण मस्कर, उत्तम रवंदे, संतोष चव्हाण, रवि शिंदे, विजय मुतालिक, उत्तम पाटील, आनंदा मकोटे, सागर मोळे, उत्तम शेळके, विजय चव्हाण, पदाधिकारी उपस्थित होते.