मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कोणत्याही राष्ट्रवादीच्या नेत्यावर किंवा कार्यकर्त्यांवर मर्यादा सोडून टीका केली, तर ते आम्ही सहन करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिला आहे. पवार यांच्यावर मंगळवारी रात्री तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर समाज माध्यमांवर दिल्लीतील काही भाजप नेत्यांनी आणि काही नेटकऱ्यांनी शरद पवारांवर विकृत पोस्ट टाकल्या आहेत. यावर शेख यांनी उत्तर दिले आहे.   

शरद पवार यांच्या आजारपणाविषयी सोशल मीडियावर हीन दर्जाची पोस्ट करणाऱ्या विकृतांवर कारवाई केली जाणार आहे. सायबर क्राईम विभागाकडे अशा युझर्स विरोधातच तक्रार दाखल केली आहे, असे शेख यांनी सांगितले. भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी हद्दच पार केली आहे. साहेबांवर केलेली टीका आमच्या जिव्हारी लागणारी होती. त्यामुळे सोशल मीडियावर टाकलेल्या विकृत पोस्टवर आयटी कलमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अशा लोकांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शेख यांनी यावेळी दिला आहे.