राणेंच्या अटकेसाठी दबाव टाकल्याचे सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन…

0
72

रत्नागिरी  (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांच्या अटकेसाठी मी दबाव टाकला असल्याचे सिद्ध झाल्यास तर राजकारणातून संन्यास घेईन, असा दावा शिवसेना नेता व पालकमंत्री उदय सामंत  यांनी केला आहे. सिंधुदुर्गमधील जन आशीर्वाद यात्रेला ब्रेक लावण्यासाठी जमावबंदी लागू केल्याचा आरोपही सामंत यांनी फेटाळून लावला. ते आज  (गुरूवार) रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलत होते.

ते  पुढे म्हणाले की,  प्रत्येकाला आपल्या नेत्याबद्दल अभिमान असतो. आम्हाला मुख्यमंत्र्यांबद्दल अभिमान आहे. त्यांचे काम चांगले आहे. म्हणूनच देश पातळीवर पहिल्या ५ क्रमांकात उद्धव ठाकरे यांचे नाव आले आहे. त्यामुळे काही लोकांना पोटशूळ उठला  असल्याची टीका त्यांनी केली.

काहींनी पदाचा गैरवापर करून अशा पद्धतीची जमाबंदी केली असल्याचा आरोप केला आहे. परंतु खोटेनाटे आरोप करण्यापूर्वी शहानिशा करावी. सिंधुदुर्गात १४४ कलम गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लावले असावे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमध्ये राजकीय हस्तक्षेप करणे योग्य नाही. जनआशीर्वाद यात्रेला किती भाजपचे कार्यकर्ते आले हेही सर्वांनी पाहिले आहे. प्रत्येकाने प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचा सन्मान करावा, हीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती असल्याचे त्यांनी सांगितले.