कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज (शुक्रवार) भाजपा किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने झुणका-भाकरी आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्यामुळे सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्याला झुणखा-भाकरी खावी लागत असल्याच्या निषेधार्थ झुणका भाकरी आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर जाहीर करण्यात आलेले ५० हजारांचे अनुदान तातडीने मिळावे,  गेल्या महापूरातील नुकसान भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, लाईट बील माफ करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसह शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या करण्यात आल्या. दरम्यान हे इशारा आंदोलन असून त्याचा वणवा होईल. त्यामुळे राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्यात. अन्यथा येथून पुढे सरकारला सळो की पळो करून सोडणार, असा इशारा भाजप किसान मोर्चाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष भगवान काटे यांनी दिला.

आंदोलनात सचिन तोडकर, अॅड. सोनाली मगदूम, डॉ अश्विनी नवघरे,  विठ्ठल पाटील, हंबीरराव पाटील, पृथ्वीराज यादव, रणजित जाधव यांच्यासह भाजप किसान मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.