मी कोणासमोरही झुकणार नाही : पंकजा मुंडे

0
24

बीड : (वृत्तसंस्था) : ‘संघर्ष माझ्या रक्तात आहे आणि तो मी करत राहणार, थांबणार नाही, मी संघर्षाला घाबरत नाही. मी वचनाला मुकणार नाही, थकणार नाही, मी कोणासमोरही झुकणार नाही. मी कोणत्याही आगीतून नारळ बाहेर काढायला घाबरत नाही. असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. भगवान गडावर आयोजित दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या.

‘आपला मेळावा कोणावर चिखलफेक करणाऱ्यांचा नाही तर चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा असल्याचे पंकजा मुंडे यांनी ठासून सांगितले. गोपीनाथ मुंडेंना संघर्ष नव्हता का? त्यांच्या वाट्याला कायम संघर्ष आला. प्रवाहाविरोधात जात ज्या पक्षात कोणीच जात नव्हतं, त्या पक्षात गोपीनाथ मुंडे कमळाचं फुल हातात घेऊन आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढले. त्यांचा संघर्ष कमी झाला का? ४० वर्षांच्या राजकारणात केवळ साडेचार वर्षे सत्ता मिळाली. हा संघर्ष कमी आहे का? त्या गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष आपल्यासमोर आहे,’ असे पंकजा मुंडेंनी सांगितले.

‘मी कधीही कोणावर खालच्या पातळीची टीका केली नाही, कधी शत्रुवरही टीका करत नाही, वाईट बोलत नाही. पण तुम्ही माझ्यासाठी इथे आलात. हे पाहून मला आनंद झाला. पण तुमच्यासाठी खुर्च्या ठेवण्याचीही ऐपत नाही. तुमची व्यवस्था करण्याचीही माझी ऐपत नाही. तुमच्यासाठी खुर्च्या ठेवल्या असत्या तर हा मेळावा चौपट झाला असता,’ असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लगावाला.

मी २०१९ च्या निवडणुकीत पराभूत झाले तेव्हापासून आपल्या ताईला काहीतरी मिळावे असे लोकांना वाटते; पण मला नाही मिळाले तरी मी नाराज नाही. कोणीही पदाची अपेक्षा करायची नाही. आपल्याला जे मिळाले आहे ते समाजाची ताकद वाढवण्यासाठी मिळाल आहे; पण समाजाच्या भिंती बांधण्याचा प्रयत्न केला, तर त्याला क्षमा नाही. मला पद मिळाले नाही तरी माझी तक्रार नाही, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.