नवी दिल्ली  (वृत्तसंस्था) : भाजपमध्ये प्रवेश करणार का? या प्रश्नांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद  यांनी उत्तर देऊन याबाबत होणाऱ्या चर्चांचे खंडन केले आहे. ज्या दिवशी काश्मीरमध्ये काळा बर्फ पडेल, त्या दिवशी मी भाजपमध्ये प्रवेश करेन.  भाजपच काय मी त्या दिवशी कोणत्याही दुसऱ्या पक्षात प्रवेश करेन, असे आझाद यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद नुकतेच राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. आझाद हे आपले चांगले मित्र आहेत, असे म्हणत मोदींनी त्यांचे कौतुक केले होते. यावेळी मोदींना भाषणादरम्यान अश्रूही अनावर झाले होते. त्यानंतर आझाद  काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. आझाद यांना मुलाखतीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवर प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले आहे.