जालना (प्रतिनिधी) : भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. आमचे शंभर आमदार आहेत, उद्या विधानसभेत उलटा टांगेन, अशा शब्दांत लोणीकर यांनी परतूरच्या पोलीस निरीक्षक आणि आयपीएस अधिकाऱ्याला फोन करून धमकावल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.

परतूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.पी. ठाकरे व परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी हसन गौहर यांच्याशी फोनवर बोलताना लोणीकर यांची जीभ घसरली. या वादग्रस्त संभाषणाची कॉल रिकॉर्डिंग क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.    यात लोणीकर यांनी पोलीस निरीक्षक आर.पी. ठाकरे यांचा पाणउतारा केल्याचे ऐकू येत आहे.

या ऑडिओ क्लीपमध्ये लोणीकर यांनी म्हटले आहे की, मला परतूरच्या दहा पंधरा व्यापाऱ्यांचे फोन आले आहे. ओमप्रकाश यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला होता. शहरात खुलेआम दारू, मटका आणि दोन नंबरचे धंदे सुरू आहे. तुमच्या साहेबाला, काही अक्कल नाही का? तो बिचारा प्रामाणिक माणूस आहे.कोर्टाचा आदेश नसताना लोकांच्या घरात घुसता कसं काय?  तो साधा गुटखा सुद्धा खात नाही. एवढ्या मोठ्या श्रीमंत माणसाच्या घरावर धाड टाकताय, सापडलं का काही? साहेब आयपीएस अधिकारी आहे, त्याला काही बुद्धी आहे की नाही? तुम्ही काय रझाकारी लावली आहे का? विधानसभेत उलटा टांगेन तुम्हा सगळ्यांना, आयपीएस अधिकारी झाला म्हणून लय मोठा झाला आहे का? विधानसभेत १०० आमदार आहे, सस्पेंड करण्याची मागणी करतील, त्याला एसपी व्हायचं आहे म्हणा, त्यामुळे माज चढल्यावाणी करू नको म्हणा.