कागल (प्रतिनिधी) : सत्तांतर झाल्यानंतर राज्यपाल कोट्यातून माझ्या आमदारकीबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, मी राज्यपालांच्या आशीर्वादाने नव्हे तर जनतेच्या आशीर्वादाने हसन मुश्रीफ यांना पराभूत करून आमदार होणार, आणि मी आमदार म्हणजे कागलची जनताच आमदार होणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. ते आज (गुरुवार) कागल येथे बांधकाम कामगारांना साहित्य वाटपावेळी बोलत होते. यावेळी ओबीसी आरक्षणसाठी, प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान, वीज बील सवलतीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार करण्यात आला.

समरजितसिंह घाटगे म्हणाले की, कागलमधील दादागिरीची भाषा आता जनताच बंद करणार आहे. शासनाच्या योजना पारदर्शीपणे जनतेपर्यंत पोहोचवूया. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कुणाच्या दबावाखाली राहत असल्यामुळे त्यांना न्याय देऊ. संजय गांधी निराधार योजनेच्या समितीच्या लाभार्थ्यांना विनाकपात संपूर्ण पेन्शन घरपोच देऊ. हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सर्वसामान्यांचे प्रश्नांसाठी किती वेळा चर्चा केली ? आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कागलमध्ये तीनवेळा आणले. मात्र,  अजित पवार यांनी त्यांना दोनवेळा कागलमध्ये येतो म्हणून टोलवले. यातच त्यांचे पक्षांमध्ये किती वजन आहे, हे दिसून आल्याचा टोलाही त्यांनी मारला.

यावेळी, राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे, आरपीआयचे प्रदीप म्हस्के, शिवगोंडा पाटील,पंडीत चव्हाण, पंडीत पाटील, लक्ष्मीबाई सावंत, संतोष गायकवाड, रमीज मुजावर, विलास कांबळे, अमन आवटे, अरुण गुरव, संदीप शिंदे आदी उपस्थित होते.