कोल्हापूर (प्रतिनिधी) :  ‘मला एक फोन लावायचा आहे’ असे सांगून हातातील मोबाईल हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना करवीर उपविभागीय पोलीसांनी विचारेमाळ कोरगांवकर हायस्कूलजवळ अटक केली आहे. विजय बाळासाहेब जाधव (वय २०, रा. शिये फाटा ता. करवीर), निलेश शिंदे (वय २१, रा. शाहू महाविद्यालयाजवळ, विचारेमाळ, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून मोबाईल संच आणि मोपेड जप्त करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, १५ ऑगस्ट २०२१ रोजी निगवे गावच्या हद्दीत अभिषेक भोसले यांच्याकडून मला फोन लावायचा आहे असे सांगत त्यांच्याकडून दोघांनी फोन हिसकावून पलायन केले होते. याबाबत भोसले यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीसांचे पथक तपास करीत असताना वडणगे, निगवे येथे मोबाईल चोरी करणारे आरोपी विचारेमाळ येथे असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली.

त्यानुसार आरोपींच्या वर्णनाप्रमाणे विचारेमाळ येथे हे दोघेजण काळ्या रंगाच्या मोपेडजवळ थांबल्याचे पोलीसांच्या निदर्शनाला आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी त्यांना खाक्या दाखवताच त्यांनी निगवे आणि वडणगे येथे मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले.

ही कारवाई करवीर डीवायएसपी आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर विभाग पथकातील पोलीस अंमलदार राम माळी, सुजय दावणे, सुनिल कुंभार, विजयकुमार शिंदे, आकाश पाटील, सुनिल माळी, रोहित कदम यांनी केली.