मुंबई (प्रतिनिधी) : माझ्यावर विषप्रयोग कुणी केला, ते मला कळले होते. पण त्या व्यक्तीविरोधात काहीही कारवाई करता आली नाही, कारण माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता. पण त्यावेळी त्या माणसाच्या अशा वागण्याचे आम्हाला नवल वाटले होते, असा गौप्यस्फोट गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत केला.

१९६३ मध्ये लता मंगेशकर प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता. याबाबत खुलासा करताना लता मंगेशकर यांनी सांगितले की, हा विषप्रयोग कुणी केला? हे मला कळले होते, पण माझ्याकडे पुरावा नव्हता.

माझ्यावर विषप्रयोग झाल्यानंतर मी खूप आजारी पडले होते. मी जवळपास तीन महिने अंथरुणाला खिळून होते. डॉ. आर.पी. कपूर यांनी मला या आजारातून बरे केले. तीन महिने माझे गाणेही बंद होते. मला भयंकर अशक्तपणा आला होता. मला उठून चालताही येत नव्हते. मी भविष्यात चालू शकेन की नाही असाही प्रश्न पडला होता. तसेच लता मंगेशकर पुन्हा गाऊ शकणार नाहीत. अशाही चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्या अफवा ठरल्या, असेही लता मंगेशकर यांनी सांगितले.