पुणे (प्रतिनिधी) : भाजप नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळण्याचे याआधी अनेकादा मुहूर्त काढले आहेत. दरम्यान, आज (रविवार) सिंधूदूर्ग दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहा यांच्या पायगुणाने राज्यातील सरकार जावे, अशी इच्छा राणे यांनी व्यक्त केली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी टोला लगावला आहे. ते बारामती येथे पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, नारायण राणे हे आमचे जुने सहकारी आहेत. पण ते असे विनोद करतात, हे मला माहिती नव्हते. त्यांच्या वक्तव्याकडे विनोद म्हणूनच पाहावे. नारायण राणेंच्या वक्तव्याकडे त्यापेक्षा अधिक लक्ष देण्याची गरज नाही, असा टोला पवारांनी लगावला आहे. दरम्यान, अमित शहा यांच्या पायगुणामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावे, आणि कर्तबगार सरकार अस्तित्वात यावे, असे राणे यांनी म्हटले होते. राणेंच्या या वक्तव्यावर पवारांनी उत्तर दिले आहे.