नागपूर (प्रतिनिधी) : सकाळी विमानतळावर जाण्यासाठी बाहेर निघालो असता, पोलिसांनी आम्हाला थांबवले आणि आपल्याला येथून जाऊ न देण्याचे आदेश दिले. माझे विमान सकाळी ९.११ वाजताचे होते, ते हुकले आहे. या प्रकाराबाबत मी फोनवरून माहिती घेत आहे, की थांबवण्याचे कारण काय? आजचा मोर्चा शांततेनेच होणार आहे, तरीसुद्धा अडवून ठेवण्यामागचे कारण कळले नाही. नेमके कोण अडवत आहे, याचा शोध आम्ही घेत आहोत. मी नाही गेलो तरी आजचे आंदोलन होणारच असल्याचा स्पष्ट इशारा शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.

नवीन कृषी कायद्याच्या विरोधासाठी मुंबईतील अंबानीच्या कार्यालयावर विविध शेतकरी संघटनांतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात सहभागी होण्यासाठी कडू जात होते. त्यांना रोखण्यात आले. नागपुरातील सिंचन विभागाच्या गेस्ट हाउसवर ते अडकून आहेत. त्यांना नागपूरच्या विमानतळावर जाऊ दिले जात नाही. गेस्ट हाउसच्या परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

यासंबंधीत ते म्हणाले, मोर्चा नक्की निघेल. सर्व जण तेथे पोहोचले आहेत. आमचे कार्यकर्तेदेखील पोहोचले आहेत आणि मीसुद्धा मुंबईला लवकरच पोहोचणार आहे. अजून दोन विमान आहेत. तरीही अडवले तर मी माझ्या पद्धतीने पोहोचेन. त्याची पद्धत कोणती हे मात्र वेगळे असेल.