कागल (प्रतिनिधी) :  कोरड्या नदीत पाण्यासाठी खड्डे खोदलेला आणि ऊसात वाकुरी मारलेला मी जातिवंत शेतकरी आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच पर्यटनासाठी बांधा-बांधावर जाणारा मी नव्हे, असेही मुश्रीफ पुढे म्हणाले.  ते कागल शहरातल्या जाधव मळ्यातून करनुरकडे जाणाऱ्या पानंद रस्त्याच्या शुभारंभावेळी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतुल जोशी होते.

यावेळी करनूर पानंद, वंदूर पानंद, मौलाली मळा पानंद, करंजे पानंद, पसारेवाडी पानंद, आदी पानंदीच्या खडीकरण, रुंदीकरण, मजबुतीकरणासह डांबरीकरणाच्या साडेसहा कोटी कामांचा शुभारंभ श्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.

यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, १९७२  साली वडिलांच्या निधनानंतर थोरल्या बंधूंच्या नोकरीमुळे शेतीची जबाबदारी माझ्यावर पडली. महाविद्यालयीन शिक्षणाकरीता मी दररोज शेतात जायचो. १९८०-८१ च्या दरम्यान  काळम्मावाडी धरण नव्हते. त्यावेळी नदीत शेतीच्या पाण्यासाठी मी खड्डे खोदलेला आणि ऊसात वाकुरी मारलेला मी जातिवंत शेतकरी आहे. शेताकडे जाताना गुडघाभर चिखलातून गमबूट घालून वाट काढणे हेही मी अनुभवले आहे, असेही ते म्हणाले.

माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, अलिकडे काहीजण निव्वळ स्टंटबाजी करीत स्वतः झुणका भाकर सोबत घेऊन बांधावर जात आहेत. हाच धागा पकडत भैय्या माने म्हणाले, ते बांधावर जाऊन शेतकर्‍यांना फसवत आहेत मंत्री हसन मुश्रीफ शेतात आणि बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहेत.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, नगराध्यक्ष सौ. माणिक माळी, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, अतुल जोशी, पी. बी. घाटगे, नगरसेवक सतीश घाडगे, विवेक लोटे, बाबासाहेब नाईक सौ. शोभा लाड, सौ. माधवी मोरबाळे आदी उपस्थित होते.