कोल्हापूर (प्रतिनिधी) :  आपल्या भवतालच्या प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहे, परमेश्वराच नाव घेत स्वत: परमेश्वर व्हा असे सांगणारे थोर सिद्धपुरुष अठराव्या शतकात होऊन गेले ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट येथे स्वामींच्या वास्तव्याने वटवृक्षाखाली दोन दशके चैतन्य ऊर्जा नांदली ती कशी हे देखील सध्या प्रेक्षकांना मालिकेद्वारे बघायला मिळत आहे. तसेच ही भूमिका मला साकारायला मिळाली याचा मला अभिमान वाटतो. असे मत जय जय स्वामी समर्थ या मालिकेमध्ये स्वामी समर्थांची प्रमुख भूमिका साकारणारे अक्षय मुडावदकर यांनी व्यक्त केले आहे.

मुडावदकर म्हणाले की, श्री स्वामी समर्थांनी अन्यायाला मोडीत काढत आणि मार्गातल्या असंख्य लोकांचा उध्दार करीत, त्यांना उपदेश करीत स्वामी समर्थ कसे सोलापूर येथील अक्कलकोट येथे पोहचले. तशी त्यांची प्रचिती येत गेली. अक्कलकोट येथील चोळप्पाशी, सेवेकरी सुंदराबाई, अक्कलकोटचे राजे मालोजीराव, या भक्तांनी स्वामीलीला अनुभवली. त्यांचे कसे नाते होते आणि या मार्गात आणखी कोणकोणती माणसे श्री स्वामी समर्थांच्या मार्गात आली. हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये बघयाला मिळणार आहे. ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.०० वा.  ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सुरू आहे. याचे लेखन शिरीष लाटकार यांनी केले असून या मालिकेची निर्मिती कॅम्सक्लबने केली आहे.

विशेषत: तरुण पिढीला स्वामी समर्थ आणि त्यांचे तत्वज्ञान दिशादर्शक वाटत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे त्यांची उपासना कोणालाही कोणत्याही कर्मकांडात अडकवत नाही. नामस्मरण हीच पूजा आणि तोच यज्ञ हे त्यांचे सांगणे आहे. त्यांची वचने लाखो लोकांना आधार देतात. अशाच असाधारण सिध्दपुरुषाचे जीवनचरित्र ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांना बघण्याची संधी मिळाली आहे.

श्री स्वामी समर्थ यांनी भारतभर भ्रमण केले. त्यांचे अनुयायी आज संपूर्ण भारतभर नाही तर जगभर पसरलेले आहेत. हिमालय, भारत-चीन सीमा, काशी, त्रिविक्रम सरोवर असे भ्रमण करून ते अक्कलकोट येथे स्थिरावले. स्वामी समर्थ यांचे शेकडो वर्षांचे वास्तव्य, सुरस लीला आणि उपदेश यांनी भरलेली कथा असामान्य आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळे कलर्स मराठीवरील ही मालिका रसिक आणि भक्तांनी जरुर पहावी, असे आवाहन अक्षय मुडावदकर यांनी केले.