बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, धनंजय मुंडे, रोहिणी खडसे यांनी परळी तालुक्यातील गोपीनाथ गड येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त साहेबांच्या समाधी स्थळी जाऊन अभिवादन केले. यानंतर एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी मी वादळाची लेक म्हणत भाजपावर नाराज असल्याच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक दिवस आहे. या दिवशी मला राजकारण शून्य दिसते. इथे जे लोक आले आहेत, त्यांना मी काही दिले नाही. मी यावेळी कोणत्याही राजकारण्यांना निमंत्रित केलेले नाही. कोणत्याही मोठ्या नेत्याला बोलावले नाही. मी फक्त भजन, कीर्तन आणि मुंडेंवर निष्पाप प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम ठेवला आहे. त्या नात्याने नाथाभाऊ (एकनाथ खडसे) याठिकाणी आले आहेत.
ते कोविडमध्ये येऊ शकले नव्हते. मध्यंतरी त्यांच्यावर ऑपरेशन झाले. त्यामुळे ते आज धनंजय मुंडे यांच्यासोबत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीच्या दर्शनासाठी आले. गोपीनाथ गडावर मुंडेंवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येण्याचा अधिकार आहे. एकनाथ खडसे मुंडे यांचे सहकारी होते. त्यामुळे तेही दर्शनासाठी आले. कोणतेही राजकीय चर्चा झाली नसल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.