कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या तीस वर्षाहून अधिक काळ मी शैक्षणिक, सामाजिक आणि शेती क्षेत्रामध्ये काम करीत आहे. मला राजकीय क्षेत्रातील कोणत्याही पदावर काम करण्याची इच्छा नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदावर काम करण्यात सुद्धा मला रस नाही. माझ्या अन्य जबाबदाऱ्यामुळे या पदाला योग्य तो न्याय देता येणार नाही, अशी माहिती डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय  पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेत  मी कार्यरत आहे. या शिक्षण संस्थेचा विस्तार करत असताना मी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्याचबरोबर शेती हा सुद्धा माझ्या आवडीचा विषय असल्याने त्या विषयात सुद्धा मला आवड आहे. ज्यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाचा विषय चर्चेत येतो त्यावेळी इच्छुकांच्या यादीमध्ये माझे नाव समाविष्ट केले  जाते.

परंतु, देवस्थान समितीचे अध्यक्षपद हवे अशी इच्छा मी आजपर्यंत कोणासमोरही व्यक्त केलेली नाही किंवा त्यासाठी मी कधीही प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे अध्यक्षपदासाठी इच्छुक असण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच शैक्षणिक, शेती आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना या पदाला मला न्याय देता येणार नाही, असे या पत्रकात म्हटले आहे.