गरीब जनतेच्या प्रेमाचा मी भांडवलदार : आमदार मुश्रीफ

0
24

सेनापती कापशी (प्रतिनिधी) : कोणताही राजकीय वारसा नसताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सलग पाच वेळा विधानसभेत पाठविण्याची किमया कागल विधानसभा मतदारसंघातील जनतेने केली आहे. समाजातील शेवटचा घटक केंद्रबिंदू मानून काम केले. आजपर्यंत माझ्यावर जनतेने भरभरून प्रेम केले आहे आणि म्हणूनच या गोरगरीब जनतेच्या प्रेमाचा मी भांडवलदार आहे, असे भावनिक प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

कागल तालुक्यातील नंद्याळ येथे विविध विकासकामांचा प्रारंभ व बांधकाम कामगारांना सुरक्षा किट वाटपप्रसंगी ते बोलत होते. साडेसतरा वर्षे विविध खात्यांचा मंत्री म्हणून काम करत असताना हजारो कोटी रुपयांचा निधी आणून कागल-गडहिंग्लज-उत्तूर विधानसभा मतदारसंघात विक्रमी विकासकामे पूर्ण केली आहेत. चिकोत्रा खोऱ्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या चिकोत्रा प्रकल्प, नागणवाडी प्रकल्प पूर्ण केला. जलसंपदा मंत्री तत्काळ चार एकराचा स्लॅब रद्द करुन आठ एकराचा स्लॅब केला. यामुळे चिकोत्रा विभागातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला, असेही आ. मुश्रीफ म्हणाले.

पं. स.चे माजी सदस्य शशिकांत खोत, तालुका संघाचे अध्यक्ष सूर्याजी घोरपडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शामराव पाटील, एच. के. देसाई, आण्णा आडेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. भिकाजी कोराणे, बाबूराव अस्वले, सागर पाटील, अंकुश पाटील, ज्योती मुसळे, सरपंच राजश्री पाटील, राजेंद्र येजरे, बाळासाहेब खतकल्ले, पदाधिकारी आदी उपस्थित होते.