सोबत राहण्यासाठी पती पत्नीवर जबरदस्ती करू शकत नाही : सुप्रीम कोर्ट

0
194

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पत्नी ही काही मालमत्ता किंवा वस्तू नाही. पतीसोबत राहण्याची पत्नीची इच्छा नसेल, तरी पत्नीने आपल्या सोबतच रहावे, अशी जबरदस्ती  पती तिच्यावर करू शकत नाही, असा महत्त्वाचा निकाल  सर्वोच्च न्यायालयाने  दिला आहे. एका व्यक्तीने याचिका दाखल करून माझ्या पत्नीने पुन्हा माझ्यासोबत रहावे आणि पुन्हा आम्ही एकत्र संसार करावा, अशी मागणी केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

तुम्हाला काय वाटतं?, पत्नी काय एखादी वस्तू आहे का. की आम्ही तिला अशाप्रकारचा आदेश देऊ. पत्नी काय मालमत्ता आहे का. तिने तुमच्यासोबत जाण्याचे आदेश आम्ही कसे देऊ शकतो ?,  असा सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्याला केला.

२०१३ मध्ये लग्न झाल्यापासून पती हुंड्यासाठी माझा झळ करत होता. त्यामुळेच मला त्यांच्यापासून दूर व्हावे लागले, असे या व्यक्तीच्या पत्नीने न्यायालयाने सांगितले. सन २०१५ मध्ये या महिलेने न्यायालयामध्ये पोटगीसाठी अर्ज केला. त्यानुसार गोरखपूर न्यायालयाने या महिलेच्या पतीला महिन्याला २० हजार रुपये पोटगी म्हणून देण्याचे आदेश दिले. यानंतर या पतीने कौटुंबिक न्यायालयामध्ये याचिका दाखल करत आपले मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी केली होती. यावर न्यायालयाने वरील निकाल दिला.