कोल्हापूर (प्रतिनिधी) : पत्नीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने पतीनेही प्राण सोडले. या दुर्दैवी मृत दांपत्याचे नांव ममताबाई शंकर पोवार (वय ७०) आणि शंकर बाबू पोवार (वय ७५) असे आहे. शाहूवाडी तालुक्यातील मांजरे गावात एकाच दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मांजरे गावातील या दांपत्याचा मुलगा कामानिमित मुंबईला असतो. तर, नातू गोव्यात होता. त्यांना ममताबाई यांच्या निधनाची बातमी कळवली. दोघांना घरी येण्यासाठी संध्याकाळ झाली. ते आल्यानंतरच अंत्यविधीला सुरवात झाली. सर्व क्रियाकर्म संपवून ममताबाईचा मृतदेह उचलत असताना विरहाचा धक्का पती शंकर यांना सहन झाला नाही आणि त्यांनीही आपला प्राण सोडला. उपस्थितीत लोकांनी दोघा उभयतांची एकत्रच अंत्ययात्रा काढली. शेवटी दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार केले. आयुष्यभर सोबत संसार केल्यानंतर इहलोकीच्या यात्रेला दोघेही सोबत निघाल्याने उपस्थितांना गहिवरून आले.