हुपरी (प्रतिनिधी) : वेळ सायंकाळी सहाची…स्थान : हुपरी-रेंदाळ रस्ता. सर्वांना दिवाळीच्या सणाच्या खरेदीसाठी जाण्याची लगबग… माळभागावरील रस्त्यावरील पाथरवट कुटुंबातील लहान मुले खाण्यासाठी रडत होती. बंदोबस्तासाठी जाणारे हुपरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांची व्हॅन रस्त्याच्या कडेला असलेल्या या झोपडीसमोर अचानक थांबली..त्यांनी सोबत आणलेले आकाश कंदील झोपडीला लावले… नवीन कपडे, दिवाळीचा फराळाचे साहित्य दिले. कपडे व फराळाचे साहित्य पाहून ‘त्या’ कुटुंबातील लहान मुलांच्या चेहऱ्यावर प्रगटलेला आनंद पाहताना उपस्थितांचे डोळे पाण्याने डबडबले. नेहमी विविध शेलक्या विशेषणांनी हेटाळणी केली जाणाऱ्या पोलिसांतील माणुसकी राजेंद्र मस्के यांच्या रुपाने हुपरीकरांना दिसून आली.

हुपरी येथे सध्या कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर सर्वच क्षेत्रात सन्नाटा पसरलाय. गोरगरीब कुटुंबाचा रोजीरोटीचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होत आहे. आज सायंकाळी छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील रेंदाळ रोडवरील रस्ताच्या कडेला झोपडीत पाथरवट कुटुंबात महिला, पुरुष, लहान मुले राहतात. काम नसल्यामुळे सणाचा फराळ तर दूरच, परंतु घरात काही खाण्यास नव्हतं. त्यामुळे लहान मुले रडत, ओरडत होती. त्यांचे आई-वडील त्यांना समजावून सांगत होते.

याचवेळी दरम्यान त्यांच्या झोपडीसमोर पोलीस गाडी थांबली. वरील प्रकार पो. नि. राजेंद्र मस्के यांना कुणी तरी सांगितला होता. त्यामुळे ते तत्काळ त्या ठिकाणी आले होते. व्हॅनमधून मस्के यांच्यासहीत पी. एस. आय. पल्लवी यादव, कर्मचारी सचिन सावंत, रमेश कांबळे, माळी, दीपक कांबळे बाहेर आले. यामुळे घाबरून गेलेल्या ‘त्या’ कुटुंबाला काही समजेना. मस्के यांनी तत्काळ सोबत आणलेले फराळाचे साहित्य, आकाश कंदील, सोबत आणलेले कपडे लहान मुलांना व कुटुंबातील सदस्यांना दिले. तसेच शहरातील अन्य ठिकाणी राहणाऱ्या गरीब कुटुंबाची माहिती घेऊन त्यांनाही मदत द्यावी, असे  पोलिस कर्मचाऱ्यांना सुचवले.

या अमूल्य मदतीने ‘त्या’ कुटुंबाच्या सदस्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरारले. पाणावलेल्या डोळ्यानीच त्यांनी राजेंद्र मस्के व कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले.