‘माझी एक ओंजळ पूरग्रस्तांसाठी’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद…

0
45

कळे (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी. तसेच पूरग्रस्तांसाठी पुरेसे धान्य उपलब्ध व्हावे. यासाठी सह्यगिरीच्या वतीने कुंभी-धामणी खोऱ्यातील विद्यार्थ्यांना एक ओंजळ पूरग्रस्तांसाठी या उपक्रमातून धान्य गोळा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उदंड प्रतिसाद लाभल्याने सुमारे एक टन धान्य जमा करण्यात आले.

यावेळी कुंभी-धामणी खोऱ्यातील काही गावात विद्यार्थी आणि शिक्षकांनी गल्लोगल्ली फिरून पूरग्रस्तांसाठी धान्य गोळा केले. विद्यार्थी आणि शिक्षकांचा हा प्रयत्न पाहून येथील व्यावसायिक, ग्रामस्थ, महिला मंडळ, तरुण मंडळांनीही आपला सहभाग नोंदवला. या साहित्यामध्ये  ६५  किलो तांदूळ, ६० किलो ज्वारी, ५० किलो गहू, २० किलो मका, १०० किलो भात तसेच विविध डाळी ६० किलो, कडधान्य ३०, चटणी २५ कांदा, लसूण, साबण,साखर,बिस्किटे असे एकूण एक टन धान्य जमा झाले आहे. हे जमा करण्यात आलेले साहित्य म्हासुर्ली, कुपलेवाडी, बावेली येथील पूरग्रस्तांना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती सह्यगिरी संस्थेकडून देण्यात आली.

या मोहिमेमध्ये अध्यापक संभाजी पाटील, धुंदवडे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गणपती पालव, बाळकृष्ण जाधव, श्रीपती तेली, सागर पाटील, संतोष पाच्छापूरे, राजेंद्र कागले, संजीवकुमार भद्रोड, दिपक भोसले, अमोल कांबळे, विद्यार्थी सहभागी झाले होते.